Toy
Joy of Toy
Tuesday, April 14, 2026
दिनानाथांच्या दोघी
कधी कधी भल्या पहाटे लवकरच जाग येते. अजून पुरेसे उजाडलेले नसते. अशावेळी जर आपण शहराबाहेरच्या परिसरात असाल तर, विशेषतः गाव, बगीचा, रानात तर, पक्षी पाखरांचा किलबिलाट ऐकू येतो. हे पक्षी एकमेकांना साद घालून संवाद साधत असतात. एका पक्षाची शीळ संपताच दुसरा पक्षी शीळ घालतो, त्याची तान संपताच पुन्हा पहिला तान घेतो. एकमेकांच्या अस्तित्वाला दाद देत, साद घालत, प्रतिसाद देत आपली हद्द ते निर्माण करत असतात असे पक्षी निरिक्षकांचे व संशोधकांचे म्हणणे आहे. मला मात्र ते नेहमीच सर्वोच्च स्थानावर असलेल्या दोन गायिकांचे द्वंद्वगीत वा युगलगीत वाटत आले आहे.
भारतीय संगीत ज्यांना प्रिय आहे अश्या संगीतरसिकांना द्वंद्वगीत, युगलगीत वा जुगलबंदी हे काही नवीन नाही. उलटपक्षी अशी दर्जेदार गाणी हेच भारतीय संगीताचे मुलभूत वैशिष्ट्य आहे. तरीही, भारतीय चित्रपट संगीताचा अभ्यास करताना, त्याच्या बद्दल आणि विशेषतः गायिका हा विषय घेऊन त्या बद्दल इतिहास लिहीताना ज्या दोन नावां शिवाय तो पूर्ण होऊ शकणार नाही ती दोन नावे म्हणजे लता आणि आशा. या दोन्ही महान व्यक्तींविषयी कितीही लिहिले गेले तरी ते कमीच आहे, शब्दांमधे मांडणे कठीण काम आहे. त्यामुळेच या दोघींनी ' एकत्र गायलेली गाणी ' या विषयावर लिहिताना मी स्वतःला काही बंधने ठेवून फक्त ठराविक मुद्दयांवर या लेखात विचार केला आहे .
लता दीदींचा जन्म 28 सप्टेंबर 1929 तर आशाताईंचा 8 सप्टेंबर 1933. जेमतेम 4 वर्षांचेच अंतर. दीदींची हिंदीतील पार्श्वगायिका म्हणून सुरवात 1945 सालची (वय वर्षे16) तर आशाताईंची 1948.(वय वर्षे15) नुरजहाँ, सुरैया, शमशाद बेगम या गायिकांची तेव्हा कारकीर्द बहरात होती. अशावेळेस आपल्या कारकीर्दीची सुरुवात करून गेली 7 दशके म्हणजेच 70-75 वर्षे या दोन्ही बहिणींनी आपआपले अधिराज्य गाजवले हे अतिशय मेहनतीने केलेल्या कर्तृत्वाचे उदाहरण आहे.
या दोघींचे एकत्र असलेले सर्वात पहिले गाणे होते 1951 मधील दामन या चित्रपटातील, ' ये रुकी रुकी हवाएं, ये बुझे बुझे सितारें ' , संगीतकार होते मराठमोळे दत्ता कोरगावकर, गीतकार राजा मेहंदी अली खान, चित्रपट दिग्दर्शक नानाभाई भट आणि कलाकार अजित, प्राण, निगार सुलताना, आगा, हिरालाल आणि यशोधरा काटजू. ( दोघींचे पहिले वहिले एकत्र गीत म्हणून एवढी सगळी माहिती दिली. .. पुढे अशी अनेक गाणी आहेत. त्या नंतरच्या त्यांनी एकत्र गायलेल्या सगळ्या गीतांची सगळी माहिती देणे मुश्किल आहे व तशी देताना ती इथुन तिथुन कुठून कुठून मिळवलेली असल्याने कदाचित काही उणिवा राहतील व वाचकांना जर अधिक काही संदर्भ ठाऊक असल्यास त्यांनी जरूर कळवावे. )
1951 - 60 या दशकात अतिशय लोकप्रिय झालेले दोघींचे एकत्र गीत होते 1956 चे ‘ कर गया रे, कर गया मुझपे जादू सावरिया ’ (‘ बसंत बहार ’). संगीतकार शंकर जयकिशन. पण त्या आधी शंकर जयकिशन यांचेच 1954 मध्ये मयुरपंख मध्ये एक सेमी क्लासिकल गाणे ' ये बरखा बहार... ' दोघींनी मिळून गायले होते. त्या शिवाय ‘मन भावन के घर जाये गोरी’ ( चोरी चोरी, 1956, शंकर जयकिशन ), ' अजी चले आओ ’ ( हलाकू, 1956, शंकर जयकिशन ), ' ओ चांद जहा वो जाए ( शारदा, 1957, सी. रामचंद्र ), ' आणि ' सखी री सुन बोले पपीहा ' ( मिस मेरी, 1957, हेमंतकुमार ) तसेच ' बचपन का मोरा तोरा प्यार सुहाना ' ( दो फुल 1958, वसंत देसाई ) ' धगिन तिनक ती रूठी जाए रे ' ( दो फुल, 1958, वसंत देसाई ), ' क्या हुआ है मुझे क्या हुआ ' ( जिस देश मे गंगा बहती है, 1960, शंकर जयकिशन ) ही या दशकातील गाणी न विसरता येणारी गाणी आहेत.
1961 - 70 हे दशक दोघींचे उत्कृष्ट दशक होते असे निश्चितच म्हणता येईल. अनेक एकत्र गीते या दोघांनी गायली. त्या वेळची कौटुंबिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, गाणे, संगीत, चित्रपट बनण्याची प्रक्रिया व प्रवास, विशेषतः स्टूडीओमध्ये सर्व साथीदारांसह होणारे ध्वनीमुद्रण, गाण्याचे चित्रिकरण, चित्रपटांची निर्मिती, प्रसिद्धी, प्रदर्शन इत्यादी सर्व गोष्टींवर ठरणारे गाण्याचे भवितव्य ह्या सगळ्याचा आज जेव्हा आपण विचार करतो तेव्हा कलाकाराची व्यावसायिकता, व्यावहारिकता कलेविषयी असणारे त्याची आत्मियता, प्रेम, झोकून देऊन काम करण्याची वृत्ती व या सगळ्या प्रवासात सख्खेपणाचे नाते जाणणे, जपणे व त्यावर तडजोड न करता कलेचा सन्मान करणे हे कीती जिद्दीचे काम आहे हे प्रत्ययास येते.
फक्त विचार करा की एकाच क्षेत्रात स्पर्धात्मक कारकीर्द करत असलेल्या दोन सख्या बहिणी एखाद्या गाण्याच्या ध्वनीमुद्रणाला एकत्र येत असतील ( तेव्हा वेगवेगळ्या ध्वनीमुद्रणाची सोय नव्हती हे खूपच सुंदर म्हणायचे ) तेव्हा एक गायिका दुसर्या गायिकेला जी घर सोडून गेलेली सख्खी बहीण आहे तीच्या बरोबरीने गाणे ध्वनीमुद्रीत करते, कुठेही व्यावसायिक कमतरता न ठेवता. मागे एकदा लोकप्रभा मासिकात शरीष कणेकर यांनी दोघींच्या द्वंद्वगीतांबद्दल सुरेख लेखन मांडले होते त्यातील काही भाग इथे पुन्हा देत आहे
दीदीबरोबर द्वंद्वगीत गाणे हा आशासाठी चित्तथरारक, रोमहर्षक व टेन्शनमुक्त अनुभव असत आलाय. तो तिच्याच तोंडून ऐकण्यातली खुमारी काही और आहे. नकलाकार आशा पदर खांद्यावरून लपेटून घेतल्याचा भन्नाट अभिनय करीत लताच्या आवाजात म्हणते, ‘‘आशा, अर्धा सूर खालचा लागलाय.’’
‘‘जाऊं दे ग.’’ आशा आशाच्या आवाजात म्हणते, ‘‘म्युझिक डायरेक्टरलाही काही खटकलेलं नाही.’’
‘‘चकाकतं ते सगळं सोनं नसतं, आशा.’’ आशा-लता बनून आशाला ठेवून देते.
इथे एक थोर गायिका दुसऱ्या थोर गायिकेला शालजोडीतला देत नसते तर थोरली बहीण धाकटय़ा बहिणीला दटावत असते. मग अशी अवीट गोडीची द्वंद्वगीते जन्म घेतात.
आशा ही लताच्या आशीर्वादाने व पाठिंब्याने आली नाही. त्यामुळे वृक्षाच्या छायेत रोपटं खुरटलं हा निसर्गनियमानुसार घडणारा प्रकार तिच्या बाबतीत घडला नाही. ती स्वतंत्र रुजली, स्वतंत्र वाढली व स्वतंत्र फोफावली. तिचा आवाज व गाण्याचा ढंग लतापेक्षा सर्वस्वी भिन्न होता. त्याचाही तिला फायदाच झाला.
ती लताची ‘डमी’ नव्हती. वेगळ्या आवाजाची, वेगळ्या आडनावाची, वेगळी गायिका म्हणून रसिकांनी तिचा स्वीकार केला. तरी जवळच्या नात्यामुळे तुलना अपरिहार्य होती. इथे तिच्यावर नकळत अन्याय होत राहिला. तिची स्पर्धा साक्षात संगीतदेवतेशी होती. आशा कमी पडत नव्हती, पण वरचढही होऊ शकत नव्हती. लता हरली असती तर ती लता कशी झाली असती? ( लोकप्रभा दिवाळी अंक 2010 , शिरीष कणेकर )
दत्ता कोरगावकरांच्या पहिल्या गीता पासून ते आजपर्यंत एक ओ. पी. नय्यर चा अपवाद वगळता जवळपास सर्वच प्रतिथयश संगीतकारांनी लता व आशाच्या एकत्र द्वंद्वगीतांचा प्रयोग यशस्वीपणे केला आहे.
1961
' हम रामचंद्र की चंद्रकला ' (संपूर्ण रामायण, वसंत देसाई )
' दिल दयी दयी ओ ना लयी लयी ' ( सेनापती, मदन मोहन ), ' प्यास बुझाने सबके मन की ' ( प्यार की प्यास, वसंत देसाई ), ' झुले मेरा ललना ' ( प्यार की प्यास, वसंत देसाई ),
1962
' हमरे गाव कोई आयेगा ' ( प्रोफेसर, शंकर जयकिशन ),
' मेहा आओ रे ' (संगीत सम्राट तानसेन, एस एन त्रिपाठी ),
1963
' खिले है सखी आज फुलवा ' ( गृहस्थी, रवी), ' तुम्हे हुस्न देके खुदा ने ' ( जब से तुम्हे देखा है, दत्ताराम वाडकर ), ' जानेमन एक नजर देख ले ' (मेरे महबुब, नौशाद ), 'मेरे महबुब मे क्या नही ' ( मेरे महबुब, नौशाद )
बने ऐसा समाज कैसा ( बहुरानी, सी रामचंद्र )
' धडका ओ दिल धडका ' ( भरोसा, रवी ), ' बीन बादल बरसात ना होगा ' (बीन बादल बरसात, हेमंतकुमार),
1964
छुने ना दुंगी मै हाथ(जिंदगी, शंकर जयकिशन)
साजन सलोना मान लो जी ( दूज का चांद, रोशन)
आज की रात मोहब्बत का नशा ( फुलोंकी सेज, आदि नारायण राव ), ‘जब जब तुम्हे भुलाया’ (‘जहाँ आरा’ मदन मोहन), मुबारक है वो दिल जिस को ( बेनझ़ीर, एस डी बर्मन )
नाच रे मन बडकम्मा (राजकुमार, शंकर जयकिशन )
1965
आंखो आंखो मे किसी से बात हुई ( जानवर शंकर जयकिशन )
1966
ए काश की दिवाने को हमसे ( आए दिन बहार के, लक्ष्मीकांत प्यारेलाल )
आ दबे लबो से कभी(बीवी और मकान, हेमंतकुमार )
सुन ले प्यार के दुश्मन दुनिया( प्यार किये जा, लक्ष्मीकांत प्यारेलाल)
1967
पड गए झुले सावन रुत आयी( बहुबेगम 1967 रोशन)
1968
जब से लगी तोसे नजरिया ( शिकार, शंकर जयकिशन )
कोई मुझसा हसीं दो जहाँ मे( सुहाग रात, आनंदजी)
हमारे आंगन बगिया ( तीन बहुरानीयां, आनंदी)
बडो का राज तो सदियो से ( वासना, चित्रगुप्त )
मै हसिना नाझनीना ( बाजी, कल्याणजी आनंदजी )
मै चली मै चली देखो प्यार की ( पडोसन, आर डी बर्मन)
1969
लेहंगा मंगा दे मेरे बाबु ( बेटी, सोनिकओमी )
नंदकिशोर नंदगोपाल झुले मेरे लाल (माधवी, लक्ष्मीकांत प्यारेलाल )
मुकाबला हम से ना करो ( प्रिन्स, शंकर जयकिशन )
1971- 80 दशक
1974
दुल्हन मैके चली ( मनोरंजन, आर डी बर्मन )
लायी कहा ये जिंदगी ( टॅक्सी टॅक्सी, हेमंत भोसले )
आ आ बात को दिल मे दबाए( धरमवीर, लक्ष्मीकांत प्यारेलाल )
बंद हो मुठ्ठी तो लाख की ( धरमवीर, लक्ष्मीकांत प्यारेलाल)
प्यार बडा है या जान बडी (खेल खिलाडी का कल्याणजी आनंदजी ),
1978
झुला झुलत कन्हैया रे (डाकू और जवान, लक्ष्मीकांत प्यारेलाल )
तोड दे तू इस बंधन को (दिल और दिवार, लक्ष्मीकांत प्यारेलाल )
कहिये कहा से आना हुआ (हिरालाल पन्नालाल आर डी बर्मन )
छाप तिलक सब छीनी रे ( मै तुलसी तेरे आंगन की, लक्ष्मीकांत प्यारेलाल),
प्यार जिंदगी है ( मुक्कदर का सिकंदर, कल्याणजी आनंदजी)
1979
छायी छायी नजर लग गई
( मीनाकुमारी की अमर कहानी, खय्याम),
1980
तेरे लिये जिना तेरे लिये मरना ( शान, आर डी बर्मन )
सारे शहर मे ( अलीबाबा और 40 चोर, आर डी बर्मन)
1981- 90 दशक
1982
लौंगी मिरची ( अशांती, आर डी बर्मन ),
1984
कैसे प्यार होता है एक दो ( बाज़ी 1984***** )
1985
‘मन क्यूं बहका री बहका’ (उत्सव, लक्ष्मीकांत प्यारेलाल )
1986
सुन री मेरी बहेना, सुन री मेरी सहेली ( स्वर्ग से सुंदर, लक्ष्मीकांत प्यारेलाल )
आता या सूची ला समोर ठेवून जेव्हा आपण एका एका गाण्याचा अभ्यास करतो तेव्हा असे लक्षात येते की खरोखरच किती प्रचंड मेहनत या सर्वच गाण्यांमागे उभी आहे. गीतकार, संगीतकार, वाद्यवृंद कलाकार, कोरस देणारे साथीदार, तांत्रिक सहाय्य देणारे सहकारी आणि सरतेशेवटी दोघी बहिणी असूनही एकमेकींच्या गायिका म्हणून अस्तित्वाचा सन्मान ठेऊन, एकमेकींना पुरक ठरत जी काही सुरांची किमया साधलेली आहे ती केवळ अवर्णनीय आहे.
दोघीही मराठमोळ्या कलाकार असूनही आणि मराठीतही त्यांची उतुंग कारकीर्द असूनही मराठी संगीतविश्वात मात्र हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेल्या ' अंतरीचा दिवा ' या चित्रपटातील ' येशील कधी परतूनी जिवलगा ' या एकमेव गाण्याव्यतिरिक्त इतर कोणतेही एकत्र गाणे नाही हे मराठी संगीतक्षेत्राचे दुर्दैव, दुर्लक्ष म्हणावे लागेल.
या शिवाय ' मै तेरी नजर का सुरूर हू ' ( जहाआरां, मदन मोहन 1964 ***** )
लागली लागली हिचकी ( आग ही आग1987 ****)
समय ओ धीरे चलो (रुदाली 1993 ****)
आईना है मेरा चेहरा ( आईने 1993**** ) या चार गीतांबद्दल दोन संकेतस्थळे वेगवेगळी माहिती देतात. तसेच एकत्र न गायलेली परंतू एकच गाणे किंवा एकाच मुखड्याच्या वेगवेगळ्या कडव्यांची, वेगवेगळ्या वेळी ( जनरेशन / सिच्युएशन ) लता आणि आशा यांनी गायलेलीही गाणी अतिशय श्रवणीय आहेत त्यांचा या लेखात समावेश केलेला नाही.
Subscribe to:
Comments (Atom)