Toy
Thursday, November 21, 2013
अनंत आमुची ध्येयासक्ती...
ö प्रसाद पाठक
फुटबॉल हा खेळ आपणा सर्वांना माहीत असेलच. क्रिकेटवेड्या आपल्या देशात फुटबॉलप्रेमी त्यामानाने कमीच असतील पण संपूर्ण जगामध्ये सर्वाधिक लोकप्रिय खेळ हा फुटबॉल आहे. जगभरात जास्तीत जास्त देशांमध्ये फुटबॉल खेळला जातो. आता तुम्हाला प्रश्न पडले की फुटबॉलविषयी मी का बोलतोय... तर हा खेळ नेहमी मला एका चांगल्या गोष्टीकडे, चांगल्या विचारांकडे प्रेरित करतो आणि तो विषय म्हणजे ‘ध्येय’!
फुटबॉल खेळात एका ठराविक आखलेल्या चौकटीत दोन विरूद्ध गोलपोस्ट असतात. दोन प्रतिस्पर्धी संघाचे खेळाडू आपापल्या सहकाऱयांकडे चेंडू सरकवित तो प्रतिस्पर्धी संघाच्या गोलपोस्टमध्ये मारून ‘गोल’ साधण्याचा अटोकाट प्रयत्न करीत असतात. अधिकाधिक गोल करण्याचे त्यांचे उद्दिष्ट्य असते व हे उद्दिष्ट्य गाठून अंतिमत: संघाला विजयी करण्याचे त्यांचे ‘ध्येय’ असते. सारे खेळाडू स्वप्रयत्नाने आणि संघभावनेने एकत्रितरीत्या या ध्येयासाठी खेळत असतात. असाच काहीसा प्रकार हॉकी, बेसबॉल, बास्केटबॉल आदी मैदानी खेळांमध्येही असतो. पण फुटबॉल हा जास्त लोकप्रिय असल्यामुळे त्याचे उदाहरण!
आपल्या सणांच्या संस्कृतीमध्येही असाच एक प्रकार हा ध्येय गाठण्याचा असतो आणि तो म्हणजे ‘दहिहंडी’. उंचावर बांधलेल्या दहिहंडीतले ‘ध्येय’ गाठण्यासाठी एकमेकांच्या मदतीने एकावर एक थर रचत; नवनवी उंची गाठत ध्येयापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न या दहिहंडी संस्कृतीचा पाया आहे.
या आणि अशा खेळांमधून ‘ध्येय’ गाठण्यासाठी मनाची म्हणजे मानसिक व शरीराची म्हणजे शारिरीक तयारी होणे महत्त्वाचे.
आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज करतो तेव्हा आपला Bio-data सादर करतो. त्यात बरेचदा आपण आपल्या आयुष्यातील Objective, Aim, Purpose, Goal, Achivement आदींविषयी लिहीत असतो. हे लिहिताना आपल्याला बरेचदा सोप्पे वाटते किंवा आपण कुठुनतरी Copy-Paste करत असतो. पण प्रत्यक्ष आयुष्यात आपल्याला या शब्दांचे महत्त्व आणि त्यांची आयुष्यातली आवश्यकता यांची माहिती असणे गरजेचे असते.
मनुष्य हा असा एकमेव प्राणी असावा ज्याला ‘मन’ या गोष्टीशी झुंजावे लागते. हे ‘मन’ नावाचे जे काही असते ते माणसाला कधीच स्वस्थ बसू देत नाही. अनेक इच्छा-आकांक्षा, स्वप्ने मनात घर करून असतात आणि त्यांच्या पूर्तीसाठी माणूस झगडत असतो. याच इच्छा-आकांक्षा, स्वप्नांना जर काही ठोस, कृतीशील प्रकारात माणसाने व्यक्त करायचे ठरविले तर ते त्याचे ‘ध्येय’ ठरू शकते. मग ते ध्येय वेगवेगळ्या वयात, वेगवेगळ्या स्वरूपात आणि वेगवेगळ्या प्रकारचे असते.आपल्याला हवे ते मिळविण्यासाठीचे प्रयत्न करणे हे जर ध्येयाचे पहिले पाऊल मानले तर जस जसा माणूस वयाने मोठा होत जातो, अनुभवाने विचारी बनत जातो, तस तसे या इच्छा-आकांक्षांना एका विशिष्ट उद्दिष्ट्यापर्यंत नेणे हे क्रमप्राप्त ठरते आणि ते उद्दिष्ट्य गाठणे हे ध्येयपूर्तीचे अंतिम पाऊल असते.
कवी कुसुमाग्रज यांची ‘कोलंबसाचे गर्वगीत’ नावाची एक कविता आहे त्यात अथांग समुद्रवरून जगप्रवासाला निघालेला कोलंबस असे म्हणतो की, ’किनारा तुला पामराला...“ किनारा म्हणजे शेवट. हा सागराला असतो. माझ्यासारख्या सागरावरून जगप्रवासाला निघालेल्या प्रवाश्याला असा काही शेवट नसतो. त्या आधी ‘अनंत आमुची ध्येयासक्ती...’ असेही तो म्हणतो. म्हणजे अनेक प्रकारचे विचार, इच्छा, आकांक्षा मनात येत असतात आणि त्यातून अनंत गोष्टींचा ऊहापोह मनात होत असतो. या सर्व मंथनातून एक ध्येय निश्चित करून त्या दृष्टीने त्या दिशेने वाटचाल करणे हेच माणसाने शिकले पाहिजे. अनुभवले पाहिजे. अंगिकारले पाहिजे. या ध्येयासाठी अथक प्रयत्न करणे, लक्ष विचलित होऊ न देता ध्येयाला आपले अंतिम ‘लक्ष्य’ बनविणे गरजेचे असते. असे करणे खूप अवघड असते पण त्यातच खऱया विजयाचा मार्ग दडलेला असतो. महाभारतात याचा एक उदाहरणस्वरूप प्रसंग आहे. कौरव-पांडव एकत्रितपणे गुरू द्रोणाचार्य यांचेकडे शस्त्रास्त्रविद्या व इतर ज्ञान मिळविण्यासाठी अध्ययन करीत असतात. त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरू द्रोणाचार्य सर्व शिष्यांना एका बागेत घेऊन जातातआणि त्यांच्या धनुर्विद्येची परिक्षा घेण्याचे ठरवितात. त्यासाठी ते लांबवरच्या झाडावर एक खराखुरा दिसणारा परंतु लाकडापासून बनविलेला पक्षीöपोपट ठेवतात आणि शिष्यांना त्या पक्ष्याविषयी; लक्ष्याविषयी सांगून त्या पक्ष्याच्या डोळ्याचा बाणाने वेध घेण्यासाठी सांगतात. प्रत्येक शिष्याने बाणाने नेम धरला की, ते त्याला विचारीत ’बाळ! तुला समोर काय दिसते आहे?“ काही शिष्य सांगत की, मला आजूबाजूचे सर्व काही दिसते आहे. काही सांगत मला पक्षी, फळ, झाड, फांद्या इत्यादी दिसत आहे. असे करत-करत अर्जुनाची वेळ येते. गुरू द्रोण जेव्हा अर्जुनाला विचारतात ’बाळ! नेम धरल्यावर तुला काय दिसत आहे?“ तेव्हा अर्जुनाने उत्तर दिले, ’गुरुवर्य! मला फक्त आणि फक्त पक्षाचा डोळाच दिसतो आहे.“ असे म्हणून त्याने बाणाने पक्षाच्या; लक्ष्याचा वेध घेतला. म्हणजेच ज्या माणसाचे ‘लक्ष’ हे नेहमी फक्त आपल्या ध्येयाकडे; उद्दिष्टाकडे; लक्ष्याकडेच असते, त्याशिवाय त्याला काहीही दिसत नाही, त्यालाच ते ध्येय, लक्ष्य प्राप्त करता येते.
अनेक अडथळ्यांवर जिद्दीने मात करत त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मार्गक्रमणा करणे आणि यशस्वी होणे यातील समाधानासारखा आनंद नाही. माणसाच्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षणही तोच असतो, ज्यावेळी तो जे ध्येय ठरवितो ते प्रयत्नांती पूर्ण करून समाधानाचा आनंद मिळवतो आणि यशस्वी होतो. यशाचा आनंद हा वेगळाच असतो. आपण पाहिलेल्या स्वप्नांची पूर्ती करणे, आपण ठरविलेले उद्दिष्ट्य गाठणे यात कर्तव्यपूर्तीचा भाग असतो आणि अशी कर्तव्यपूर्तता आयुष्याला परीपूर्णता देते. म्हणूनच ध्येय ठेवतानाही ते सहज, सोप्पे ठेऊन उपयोगाचे नाही. ‘सहज मिळे त्यात जीव तृप्तता न पावे, जे सुदूर... जे असाध्य... तेथे मन धावे’ असे मनात आणून निश्चित केलेल्या गोष्टीपर्यंत पोहोचून ती प्राप्त करणे यांत मिळणारा आनंद, समाधान हे निराळेच असते. दहिहंडीचेच पहा ना, ती जितकी उंचावर तितकी ती मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न व त्यातील थरार हा यश, आनंद अधिक द्विगुणीत करणारा असतो. अशा ध्येयप्राप्तीतून तुम्ही स्वत:लाच नव्याने शोधत असता. तुम्ही स्वत:ला नव्याने सिद्ध करत असता. तुम्ही स्वत:ला नव्याने जगासमोर मांडत असता.
आपल्या आजुबाजूला समाजात अशी अनेक उदाहरणे पाहण्यात असतील, ज्यात त्या व्यक्तीने शुन्यापासून सुरूवात करून अथवा प्रतिकूल परिस्थितीशी झगडत, अथक प्रयत्न करत अंतिमत: आपले ध्येय प्राप्त केले आहे आणि त्यातच आपल्या आयुष्याचा आनंद उपभोगिला आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, शहीद भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, डॉ. आनंदीबाई जोशी, रमाबाई रानडे, गाडगेबाबा, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, बाळासाहेब ठाकरे, दादासाहेब फाळके, आबासाहेब गरवारे, जनरल अरुणकुमार वैद्य, शंतनुराव किर्लोस्कर, धिरूभाई अंबानी, बाबा आमटे, सिंधूताई सपकाळ, धनंजय पिल्लै, ‘प्लाईंग सिक्ख’ मिल्खासिंगजी, सचिन तेंडुलकर, एकनाथ सोलकर, पंडित भीमसेन जोशी, लता मंगेशकर, डॉ. रघुनाथ माशेलकर असे अनेक मान्यवर आहेत ज्यांचा उल्लेख करत राहिलो तर केवळ त्यामुळेच हा अंक भरून जाईल. तुम्हीही आपापल्या परीने या यादीत भर घालू शकता. असो.
त्याच वेळी अशा यशात आपल्याबराबर मदतीला आलेल्या आपल्या सहकाऱयांनाही सामील करून घेणे आणि त्यातून आनंद वाटणे, वाढविणे, द्विगुणीत करणे हे आवश्यक आहे, यातून आपण समाजाचे ऋण फेडू शकतो.
छोट्या छोट्या गोष्टींच्या पूर्तीपासून ध्येयाची सुरूवात करून अधिकाधिक मोठे ध्येय गाठण्याचा निरंतर प्रयत्न करणे हे मनुष्य जीवनाचे सुत्र असणे आवश्यक आहे. अशा कृतींमधून एक आत्मविश्वास माणसामध्ये निर्माण होतो. जो मनुष्याला अधिक उद्दिष्टाचे आव्हान स्वीकारण्यासाठी तयार करतो. अशा वेळी माणसाचे अंतिम ध्येय, उद्दिष्ट्य काय असले पाहिजे? याचा विचार केला तर, संत तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या ‘याचसाठी केला होता सारा अट्टाहास... शेवटचा दिस गोड व्हावा’ या काव्यपंक्ती समोर दिसतात. अनेक निरनिराळ्या योनींच्या जन्मानंतर मनुष्यजन्म प्राप्त होतो असे म्हटले जाते. या सर्व प्राणीमात्रांच्या जन्मामध्ये जीवला मोक्ष मिळत नाही पण मनुष्यजन्मामध्ये आपली कर्तव्ये, आपल्यावर असलेली मातृऋण, पितृऋण, देवऋण, गुरुऋण, मित्रऋण, समाजऋण, देशऋण इत्यादी ऋणे फेडून मनुष्य जीवन-मरणाच्या चक्रातून स्वत:ची सुटका करून घेऊ शकतो व सर्वोच्च अशा मोक्षपदाला प्राप्त करून घेऊ शकतो. हे केवळ मनुष्यजन्मातच शक्य होते असे म्हटले जाते. त्यामुळे सर्वोच्च असे हे जे मोक्षप्राप्तीचे ध्येय आहे, ते मनुष्यजन्मात आल्यानंतर प्राप्त करणे हेच मनुष्याच्या जीवनाचे मुख्य सुत्र असले पाहिजे. या ध्येयापर्यंत पोहचण्याआधी जी काही कर्तव्ये अथवा ध्येये मनुष्यजन्माला दिली गेली आहेत, ती ओळखून, पार पाडून अंतिम ध्येयापर्यंत पोहोचण्याची धडपड चालू ठेवणे गरजेचे असते. ही धडपड कोणालाही टाळता येणे शक्य नाही पण या धडपडींलाच जीवनसंघर्ष मानून, तो पूर्ण करून एक एक ध्येय, उद्दिष्ट्य पूर्ण करणे आवश्यक आहे तेव्हाच तो शेवटचा दिस गोड होऊ शकतो.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment