Toy

Toy
Joy of Toy

Wednesday, April 12, 2017

ती सध्या काय करते ? एक वेगळा अनुभव. ...

ती सध्या काय करते ? एक वेगळा अनुभव. ...

ही गोष्ट आहे 2006 ची. म्हणजे 11 वर्षांपुर्वीची. त्या वेळी फेसबुक नव्हते. सोशल मिडीया नेटवर्क नुकतेच सुरू झाले होते. Hotmail , ऑर्कुट नुकतेच लोकांना कळू लागले होते. पण त्याचे प्रचंड आकर्षण नवीन जुन्या दोन्ही पीढीला वाटत होते.

आपल्याला माहीत नसणारे पण आपल्याशी संपर्क संवाद साधू इच्छिणारे ' कुणीतरी आहे तिथे ' या जाणीवेने एक वेगळेच थ्रील वाटत होते. बर्‍याच वेळा आपल्या माणसांशी मनातले बोलू न शकणारे अथवा बोलता न येणारे , अनोळखी त्रयस्थ माणसाशी आपण सहजपणे बोलू शकतो. त्यामुळे ऑर्कुट सारख्या सोशल मीडियावर दूर कुठेतरी असणाऱ्या व्यक्तीला मित्र / मैत्रीण बनवून तिच्याशी मनातल्या गोष्टी व्यक्त करणे सोपे होऊ लागले होते. जग जवळ येऊ लागण्याचा एक नवीन टप्पाच होता तो.

असाच एक मित्र नुकताच माझा माझ्या ऑर्कुट प्रोफाईलवरून झाला होता. ( हि सत्य गोष्ट असल्यामुळे त्याचे नाव मला उघड करता येणार नाही परंतु हि गोष्ट समजण्याच्या दृष्टीने त्याचे नाव आपण अमन म्हणूया) सुरवातीच्या जुजबी ओळखी / चौकशी नंतर आमच्यात चांगला संवाद साधला जातो आहे हे लक्षात आले. अमन हा पोस्ट ग्रॅज्युएट आणि MBA finance केलेला उच्चशिक्षित तरूण असून कच्छ मधील एका शिक्षणक्षेत्राशी संबंधीत संस्थे मध्ये Faculty lecturer होता. त्याच्या पोस्ट्स वाचून मला त्याच्याबद्दल अधिक औत्सुक्य वाटत होते.

एक दिवस बोलता बोलता अमन मला मुंबईत येण्याबद्दल बोलला. तो मुळचा गुजरातमधील कच्छ मधला राहणारा सिंधी समाजातील होता. त्याला मुंबई बद्दल काहीच माहिती नव्हती पण ओढ-उत्सुकता खूप होती. त्याला मुंबईत एकेठिकाणी इंटरव्ह्यूसाठी यायचे होते. मुंबईत कुठेतरी त्याचे एक दूरचे नातेवाईक होते म्हणाला पण त्यांच्या कडे जाण्यापेक्षा दुसरीकडे कुठेतरी सोय होईल का? कारण मुंबईत आल्यासरशी 2 / 3 दिवस राहून मग परत जाणार असल्याने कुठे रहावे असे त्याने विचारले. एव्हाना त्याच्याशी बराच संवाद झालेला असल्यामुळे मी माझ्या घरीच त्याला आणावे असा विचार करत होतो. पण माझे घर अंबरनाथ म्हणजे मुंबईपासून 2 तासाचा प्रवास आणि घरी मी व आई आम्ही दोघेच असायचो. आईला त्याच्यासाठी जास्तीचा त्रास देणे मलाच अवघड वाटत होते. पण आईशी बोललो तर तीलाही आधी आश्चर्य वाटले पण नंतर सहजपणे हो म्हणाली.

कच्छ वरून अहमदाबाद आणि तेथून मुंबई असा खूपच लांबचा प्रवास आणि तोही बसचा रात्रभर प्रवास करून येणार होता तो. त्याने जे मला सांगितले त्यानुसार त्याची बस पहाटे 5.30 / 6 वाजता दादर पूर्वेला दादर टीटी सर्कल मध्ये येणार होती. मी त्याला तेथे भेटावे असे ठरले.

त्यादिवशी मी ऑफिसला सुट्टी टाकली. सकाळी 6 वा. दादर ला हजर राहण्यासाठी अंबरनाथहून मी सकाळची चार सव्वा चार ची लोकल पकडली. त्यावेळी आजच्या सारखे स्मार्ट फोनही नव्हते. त्याने जो मोबाईल नंबर मला दिला होता त्यावरून त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न मी करत होतो. पण कदाचित ट्रॅव्हलींगमध्ये नेटवर्क मिळत नसल्याने संपर्क होत नव्हता. आपल्यावर अवलंबून असलेल्या कोणाचाही आपल्यामुळे खोळंबा होता कामा नये असे माझे कायमच मत. एक्झ्याक्ट 6.10 ला दादर स्टेशनला पोहोचलो. मला तर 10 उशीर झाल्यामुळे चलबिचल वाटत होते. त्याची बस 5/ 5.30 ला च आली असेल तर...? एकटा तो कुठे, कसा थांबेल? नवीन शहर त्याला माहीती नाही त्यामुळे बावचळून जाईल अशा अनेक शंका मनात येत होत्या. धावतच मी दादर टीटी सर्कलला पोहचलो इकडे तिकडे चारही बाजूंना कोणी वाट पाहत ऊभा आहे का पहात होतो. तेथली सगळी दुकाने बंद होती किंवा नुकतीच उघडण्यास सुरवात झाली होती. कोणी दिसले नाही. सकाळचे दुधवाले, पेपरवाले अशी लोकं दिसत होती. थोडं हायसं वाटून पुन्हा एकदोनदा त्याला फोन लावले. 2 / 4 प्रयत्नांनतर एकदाचा फोन लागला...

किधर है... पहुंच गया क्या? ? चौकशी करता करता समजले की अजून तो पोहचला नव्हता. अजून त्याची बस मुंबईच्या जवळ पण मुंबई वेशीबाहेरच पार कुठेतरी मुंबई अहमदाबाद हायवेवर होती. तेथून दहिसर चेकनाका, बोरिवली मग अंधेरी, बांद्रा करत मग दादर टीटी ला येणार म्हणजे अजून कमीतकमी 1.30 ते 2 तास लागणार होते. एव्हाना 6.30 होऊन गेले होते. म्हणजे त्याची बस 8. 30 वाजल्यापर्यंत काही दादर ला येणार नव्हती. दोन तासतरी वाट पहात थांबण्याशिवाय माझ्याकडे काही दुसरा पर्याय नव्हता.

जगामध्ये वाट पाहण्याइतकी दुसरी वाईट्ट आणि कंटाळवाणी गोष्ट नसावी हे त्या दिवशी पुन्हा एकदा समजलं . सकाळची वेळ असल्यामुळे कदाचित भराभर वेळ पुढे सरकत होता पण काहीच काम नसताना नुसताच कुठेतरी बसून वाट पाहत राहणं हे खूपच कठीण. न राहवून मी पुन्हा एकदा ८.३० च्या सुमारास अमनला फोन ट्राय केला. नशिबाने लागला तर समजले मुंबईतील सकाळच्या ट्रॅफिक मध्ये त्याची बस अडकलेली असून अतिशय मंद गतीने मुंबईच्या दिशेने तिचा प्रवास चालू आहे. त्याला मधेच उतर आणि ट्रेन ने ये असे सांगणेही शक्य नव्हते कारण त्याला काहीच माहिती नव्हती. म्हणजे आणखी काही काळ वाट पाहणे अटळ होते.

कोण... कुणाचा.... कुठला.... काळा की गोरा नीटसं माहिती नसलेला, इंटरनेट वरच्या त्याने पाठवलेल्या माहितीवर विश्वास ठेऊन व त्याच्या सीव्ही वरील फोटो पाहून त्याला मित्र म्हणून मान्य केलेला हा कोणी एक तरुण आणि आपण आपले काम धाम बाजूला ठेऊन... घर कधी नव्हे ते भल्या पहाटे सोडून असे कुठे तरी त्याची वाट पाहत बसलो आहोत हे आठवून माझाच मला नवल वाटत होते हसू येत होते. इतकी वाट तर मी शाळा कॉलेज मध्ये मुलीची सुद्धा पहिली नसावी या तुलनेने मला अधिकच हसू येत होते पण आता करणार काय? शब्द तर दिला आहे... तो आपल्यावर अवलंबून आहे त्याचा विश्वासघात करणे मनाला पटत नव्हते. तर काय..... मी आणखी काही वेळ उगीचच इकडे तिकडे करत टाइमपास करत राहिलो. थोडासा चहा नाश्ताही करून घेतला. आधीच माहिती असते तर इतके अगोदर पासून आलोच नसतो ना असे वारंवार मनाला सांगत होतो पण तेव्हडेच त्याची वाटही पाहत होतो. दादर टीटी सर्कल ला खर तर फिरण्यासारखे आहे पण आणि नाही पण. त्यामुळे फिरत तर होतो पण लक्ष कशातही लागत नव्हते. दार तासाभराने त्याला फोन लावून कुठे पोहोचला विचारात होतो. कधी फोन लागत होता कधी लागत नव्हता कारण ही गोष्ट १०-११ वर्षांपूर्वीची आहे त्यावेळी नेटवर्क बोंब होतीच आणि फोन पण साधेच होते.

त्या दिवशी माझे नशीब ठीक नव्हते म्हणाना... खूपवेळ वाट पाहून म्हणजे तुम्ही विश्वास नाही करणार जवळजवळ आणखी ४ तास वाट पाहून १२.३० च्या सुमारास त्याने फोन वर मला सांगितले कि तो दादर पश्चिमेला स्टेशन जवळ उतरला आहे म्हणून. मला गोंधळल्यासारखे झाले. मी त्याने सांगितल्यानुसार दादर टीटी जवळ म्हणजे दादर पूर्वेला त्याची वाट पाहत थांबलोय आणि हा तिकडे पश्चिमेला कसा पोहचला. पण बस मधले बरेचसे सहप्रवासी दादर पश्चिमेला उतरल्यामुळे हा सुद्धा पश्चिमेला उतरला. मी धावतच फोन वर त्याच्याशी बोलत राहून पश्चिमेला कुठे, कुठल्या ठिकाणी याची माहिती घेत पूर्वे कडून पश्चिमेला निघालो.

दादर स्टेशन पश्चिमेचा परिसर ज्यांच्या परिचयाचा आहे त्यांना माझ्या गोंधळाची कल्पना येईल कारण त्याला नक्की कुठे, कसे शोधू ? कसे ओळखू हा माझ्या समोर यक्षप्रश्नच होता. त्यातूनही तो नवा, त्याला इथले काहीच माहिती नाही, त्यामुळे लॅण्डमार्क तरी कसा सांगणार, समजावणार ? ? पण शेवटी कसेतरी त्याच्याशी बोलत बोलत तू आहे तिथेच थांब मी येतो, पोहचतो तेथे असे करत करत त्याच्या शेजारी पोहचलो. .. आणि शेवटी तो भेटला. ...

अमन. ... 22 / 23 वर्षांचा, गोरा, नाजुक बांध्याचा, हस-या चेहर्‍यावर सिंधी-गुजराती मिश्रण असलेला, बोलण्या-वागण्यातून सभ्यपणा (डीसेन्सी), सुशिक्षितपणा जाणवणारा असा तो तरूण मी काहीशी कल्पना केल्याप्रमाणेच पण काहीसा वेगळेपणा जपलेला होता. मुख्य गडबड होती ती तो स्वतःबरोबर घेऊन आलेल्या अपेक्षांची आणि त्यासोबतच आलेल्या जवाबदारीची. इंटरव्ह्यूसाठी म्हणून आलेला अमन त्याच्या बरोबर चक्क कपडे-पुस्तके-सामानसुमानाच्या दोन-दोन बॅगा घेऊन आलेला होता. अखेर एकदाचा त्याला हव्या असलेल्या मुंबईत पोहचल्यामुळे तो खूप excited होता. थोडा निश्वास, सुस्कारा टाकून मी त्याला आधी तेथे जवळच असलेल्या एका हाॅटेल मध्ये घेऊन गेलो. काही खाण्याची ऑर्डर करून त्याला cool down केले.

शांतपणे चौकशी केली तेव्हा समजले की त्याचा इंटरव्ह्यू Mid Day पेपरच्या ऑफिस मध्ये संध्याकाळी 4 वाजता होणार आहे म्हणून. एव्हाना दुपारचा 1.30 वाजून गेला होता. आता इथून अंबरनाथ ला परत जाणे व 4 वाजेपर्यंत पून्हा मुंबईत करीरोड येथील मिड डे च्या ऑफिस मध्ये पोहचणे अवघड होते हे मला लक्षात आले. पण रात्रभर बस प्रवास करून आलेल्या अमन ला त्याची काहीच कल्पना नव्हती. त्याला आता फक्त फ्रेश होऊन इंटरव्ह्यूसाठी तयार व्हायचे होते.

विचार करून मी विलेपार्ले मुंबईतील दुसर्‍या एका मित्राला फोन केला. तो घरी एकटाच रहात असे. विलेपार्ले स्टेशनजवळच त्याचे घर असल्यामुळे दादर वरून पटकन एका गाडीने त्याच्या घरी जाऊन, अमन ला फ्रेश होऊन तसेच पटकन दुसर्‍या गाडीने करीरोड ला 4 वाजेपर्यंत पर्यंत पोहचणे सोप्पे होते. तो मित्रही सहृदयी असल्यानेच आमची अडचण लक्षात आल्यावर चटकन हो म्हणूनच थांबला नाही तर आम्ही त्याच्या घरी पोहचेपर्यंत त्याने आमच्यासाठी चहा सुद्धा तयार करून ठेवला होता. दरम्यान च्या काळात मी घरी अंबरनाथला फोन करून आईला रात्री उशीरा पोहचत असल्याबद्दल कळवले. पार्ल्याला मित्राच्या घरी अमन आंघोळ - आवराआवर व तयारी करून इंटरव्ह्यूसाठी तयार झाला आणि आम्ही त्या पार्लेकर मित्राचे आभार मानून करीरोड ला निघालो.

अमन साठी सगळे नवीनच आणि exciting होते पण मला त्यावेळी आपण करतोय त्या मागच्या जवाबदारीच्या जाणीवेने थकवा जाणवत होता. सकाळी 4 वाजल्यापासून सुरू झालेली माझी काळजी व धावपळ अजून सुरूच होती. करीरोड ला त्याला घेऊन जाणे, त्याचा इंटरव्ह्यू पूर्ण होई पर्यन्त त्याच्या सामानाची काळजी घेत पुन्हा एकदा वाट पहात थांबणे, त्यानंतर संध्याकाळच्या गर्दीत त्याला दादर वरून फास्ट गाडी पकडणे शक्य नाही हे लक्षात घेऊन त्याला भायखळ्याला नेऊन तेथून अंबरनाथ फास्ट गाडी पकडून त्याला अंबरनाथला घरी घेऊन येणे हे सगळे पार पाडत असताना अमन ला अधिकाधिक जाणून घेण्याचा प्रयत्न मी करत होतो आणि मला जे कळून येत होते ते प्रचंड वेगळेच, आयुष्याची वेगळीच ओळख करून देणारे, काहीशी काळजी म्हणता येणार नाही पण विचार करायला लावणारे होते... काहीसा वेगळा विचार जो या पूर्वी कधीही केलेला नव्हता.

कच्छ ला एका सर्वसाधारण सामान्य कनिष्ठ मध्यमवर्गीय सिंधी कुटुंबातील अमन हा एकुलता एक मुलगा. सिंधी लोक बहुतेक व्यापारधंद्यात असतात त्याप्रमाणे अमनची फॅमिली बॅकग्राऊंड सुद्धा उद्योगधंद्यातीलच होती. वडीलांना ती जबाबदारी फारशी चांगली सांभाळता न आल्याने कुटुंबाची आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती. कर्जाचा भार घरावर होता. तशातच आईवडील त्याच्या लग्नासाठी प्रयत्नशील होते. त्यामुळे अमनला खूपश्या गोष्टी करावयाच्या असूनही न करता आलेल्या, मनात राहून गेलेल्या, रेंगाळत असलेल्या, खुणावत असलेल्या होत्या. कदाचित त्यामुळे त्याने स्वतःला अभ्यासात गुंतवून घेतले होते व तो अभ्यासू असल्याने पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत यशस्वी होत आला होता. घरची जबाबदारी घेणे अटळ असल्यामुळे कच्छ मधीलच एका शिक्षणसंस्थेत कामाला तर लागला होता. पण फुलपंखी मन स्वस्थ बसून देत नव्हते. मुंबईत आपल्या स्वप्नांना नक्की साकार करता येईल या प्रचंड आशावादाने तो उत्साहाने मुंबईत आला होता. सर्वात मोठे आव्हान होते ते आईवडिलांच्या इच्छेविरूद्ध जाऊन लगेच लग्न न करता मुंबई-पुणे अथवा अश्या अन्य मोठ्या शहरात जाऊन आपल्याला हवे तसे आयुष्य जगण्याचे होते. बोलता बोलता तो म्हणाला की त्याला पुण्याला फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मध्ये जायचे आहे, शिकायचे आहे, लिखाण करायचे आहे. .... खूप काही करायचे आहे. ... पण. ... तो इतके सारे सामान घेऊन का आला होता याचा मला उलगडा होत होता...

त्या रात्री आम्ही अंबरनाथला खूप वेळ बोलत बसलो होतो. .. त्याने जे मला सांगितले ते ऐकून मला झोप येणे शक्यच नव्हते. जरी मी सकाळी भल्या पहाटे पासून ऊठून, धावपळ करून दमलेलो असलो तरीही... एक मुलगा इंटरनेट वरून तुमच्याशी मैत्री करतो... तुमच्या वर विश्वास ठेवून कच्छ सारख्या छोट्या शहरातील आपले घर, कुटुंब सोडून मुंबईत पुढचे आयुष्य व्यतीत करायचे म्हणून येतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याला पुढचे आयुष्य एक मुलगी म्हणून जगायचे असते हे जेव्हा तुम्हाला कळते तेव्हा तुम्हाला झोप येणे शक्य आहे का हो ?

मी दुसर्‍या दिवशी सुद्धा ऑफिसला दांडी मारली. अमन ला मुंबई पहायची, फिरायची होती. काही खरेदी करायची होती. सर्व प्रथम त्याला घेऊन मी प्रभादेवीला सिद्धीविनायक ला गेलो. त्याच्या बरोबर मी पण त्याच्यासाठी बाप्पाला प्रार्थना केली. मग तेथून वरळी हाजीअली, महालक्ष्मी, पेडररोड, बाबुलनाथ, कमला नेहरू उद्यान करत गिरगाव चौपाटीवर आलो. तिथे थोडे थांबून मग नरिमन पॉइंट वरून गेट वे ऑफ इंडिया ला आलो. सगळी मुंबई पहाण्यात त्याला खूप आनंद वाटत होता आणि त्याला आनंदी पाहून मला समाधान. मग तेथून आम्ही फॅशन स्ट्रीट वर फिरलो. त्याने एक दोन टीशर्ट खरेदी केले. मग सीएसटी वरून संध्याकाळी अंबरनाथला परत आलो. या सर्व प्रवासात मी त्याला पुढे काय करणार? आई वडीलांशी मोकळेपणाने बोल... निर्णय तूच घ्यायचा आहे पण तो पूर्ण विचार करून, विचारपूर्वक घे. कुणालाही दुखवू नकोस. आर्थिक अडचण कशी सोडवशील... असे एक ना अनेक प्रश्नांबद्दल बोलत होतो... बोलता करत होतो... मोकळा करत होतो... त्यालाही हे खूप दिवसांपासून मनात दडवून ठेवलेले मोकळे करायचेच होते. त्या शिवाय त्यालाही नीट निर्णय घेता आला नसता.

मला या अश्या जगण्यातून दमलो आहे. त्रास होतो आहे मला. कंटाळा आला आहे मला अश्या जीवनाचा. एकतर मरून जावेसे वाटतेय किंवा मग मुलगी होण्यासाठी जे करावे लागेल ते करावेसे वाटतेय. काय करू मी ? तो रडत होता, सांगत होता. मलाही कळत नव्हते की मी याला कसे समजावणार ? मुळात आपल्या कुटुंबांतील व्यक्तींकडेही व्यक्त करू शकत नसलेले सारे काही तो माझ्या कडे बोलत होता. मी लांबचा त्रयस्थ असल्यामुळे कदाचित पण त्याला माझ्याशी बोलण्यात संकोच वाटत नव्हता. मी त्याला या अडचणीतून बाहेर काढेन की नाही याची त्याला पर्वा नव्हती पण कुणाकडे तरी त्याला मनमोकळे व्यक्त व्हायचे होते. त्याचे म्हणणे ऐकून घेणाऱ्या कुणाकडे तरी. त्या वेळेपुरता तरी मी ती भुमिका स्वीकारली होती. त्याची होत असलेली मानसिक घुसमट, कुटुंब, जवाबदारी, आर्थिक अडचण, लग्नाचे बंधन, समाजाचा दृष्टिकोन, अश्या अनेक गोष्टीबाबत त्या रात्री आम्ही बोलत होतो. चटकन सुटेल असा प्रश्न नव्हताच तो. मार्ग मिळेल या आशेवरच त्याचे तुटपुंजे समाधान करत त्याला खंबीरपणे या अडचणीतून बाहेर पडण्याचा मी केवळ सल्ला दिला. तूला जे करायचे आहे ते आईवडिलांना खंबीरपणे सांगून त्यांचाही होकार मिळव.

त्याच्या परत अहमदाबाद ला जाण्याच्यावेळी त्याला बांद्रा टर्मिनस ला सोडायला गेलो तेव्हा त्याच्या भविष्याच्या काळजीने मलाही खूप अस्वस्थ केले. खूप काही गोष्टी त्याला करायच्या होत्या. ... कशा करणार तो ? त्याच्या प्रयत्नांना यश मिळेल का ? एक ना दोन अनेक शंका मनात दाटल्या होत्या. त्याला जड मनाने पण सदिच्छापूर्वक निरोप दिला आणि खूप रिक्त रिकाम्या असहाय्यक अवस्थेत परत फिरलो. तो सुखरूप घरी पोहोचल्याच्या निरोपानंतरच ती अवस्था काहीशी कमी झाली.

त्या नंतर त्याच्याशी मी अधूनमधून फोन, इंटरनेट चॅटींग, sms याद्वारे संपर्कात होतो. त्याने पुढील शिक्षण PhD पुण्यात करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याला मदतीसाठी पुण्यातील काही मित्रांचे संपर्क नंबर दिले व त्याची ख्यालीखुशाली अधूनमधून घेत राहिलो.
हा संपर्क काही काळ राहीला. खरं तर तो वाढायला हवा होता पण नंतर काही कारणाने तो तुटला. पुण्यातील ओळखीच्या मित्रांकडे चौकशी केली पण फारशी माहिती मिळाली नाही फक्त अमन पुन्हा कच्छला परत गेल्याचे समजले.

त्या नंतर बर्‍याच दिवसांनी एक दिवस अचानक गुगलवरील सर्चमध्ये गुजरात मधील एका तरूण प्रोफेसरने मुंबईत लिंग बदलाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करून घेतली ही बातमी वाचली आणि आश्चर्यचकितच झालो. एकीकडे आनंद व एकीकडे दु:ख असे दोन्ही भाव मनात एकाच वेळी दाटले. आनंद यासाठी कारण त्याने खंबीरपणे स्वतःला सकारात्मकपणे सावरले व स्वतःच्या इच्छेला प्रत्यक्ष उतरवले. तर दुःख यासाठी की आयुष्यातील एवढ्या मोठ्या निर्णयाच्या वेळी तो मुंबईत असूनही मी त्याच्या संपर्कात नव्हतो. कदाचित आयुष्याची नव्याने मांडणी आणि सुरवात करताना मागचे कोणतेच दोर त्यालाही ठेवायचे नव्हते. सगळेच त्याने तोडून टाकले असावेत. असो. ...

आज इतक्या वर्षांनी हे सगळे आठवण होण्याची आणि लिहीण्याचे कारण नुकतेच फेसबुकवर दोन ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या बातम्यांची लिंक व्हिडिओ पहायला मिळाले. तामिळनाडू राज्यातील एक तृतीयपंथी प्रीतीका यशिनी यांनी पोलीस सब इन्स्पेक्टर पदासाठी केलेली लढाई व गौरी सावंत यांनी तृतीयपंथी असूनही एका मुलीचे स्वीकारलेले पालकत्व निश्चितच प्रेरणादायी आहे.

आताच्या बदलेल्या काळात या सगळ्या बातम्यांकडे पहाण्याचा समाजाचा दृष्टिकोनही पुर्वी पेक्षा अधिक समजूतदार झाला आहे. पण तरीही अशा एखाद्या व्यक्तीला सर्वसामान्यपणे स्वीकारून त्यांना त्यांचे अधिकार मिळण्यासाठी अजूनही धडपड, संघर्ष करावाच लागतो. समलैंगिक, तृतीयपंथी, लिंगबदल करून नव्याने जीवन सुरू करू पाहणाऱ्या व्यक्ती यासर्वांना समाज कसा स्वीकारतो, त्यांची खिल्ली उडवतो का, त्यांना पुरूषप्रधान संस्कृतीत वासनेचे बळी पडावे लागते का, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षमपणे त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत मिळते का अश्या अनेक बाबींचा विचार करता आज पुर्वीचा अमन असलेला आणि आता अमिना झालेली ' ती सध्या काय करतेय ' ? हा प्रश्न आणि त्यासोबतच बनणारी इतर प्रश्नांची मालिका खरंच माझ्या समोर कोडे बनून राहिली आहे. त्याचे उत्तर कसे व कधी मिळेल हेही ठाऊक नाही. त्याला नव्हे तिला आणि तिच्या प्रमाणे आयुष्याला सामोरे जाणाऱ्या सर्वांना शुभेच्छा!

Monday, November 25, 2013

अनेक वर्षां पासून लोकं शोधत आहेत सुखाने मृत्यु येण्याचा मार्ग
आत्महत्या नव्हे,
शांतपणे, समाधानाने, डोळे मिटून घेताच पटकन
पण तो कसला
हवा तेव्हा येणार नाही चुकूनही
आणि येईल कधी तेंव्हा
अचानक, अवचित, घाला घातल्या सारखा आडवाटेने
दहशदवादी ह्हल्या सारखा
मृत्याे तू एवढा. बिभित्स कां?
काळ असूनही काळीज नाही तूला?
तूच अल्टीमेट सत्य असताना
काय तूलाच भिती असते न स्विकारले जाण्याची?
आणि म्हणूनच असा घातकी तू?
ये शांतपणे हवा तेव्हा, आपलासा बनून
आणि हो मुक्तीचा महामार्ग

Thursday, November 21, 2013


अनंत आमुची ध्येयासक्ती...
ö प्रसाद पाठक

फुटबॉल हा खेळ आपणा सर्वांना माहीत असेलच. क्रिकेटवेड्या आपल्या देशात फुटबॉलप्रेमी त्यामानाने कमीच असतील पण संपूर्ण जगामध्ये सर्वाधिक लोकप्रिय खेळ हा फुटबॉल आहे. जगभरात जास्तीत जास्त देशांमध्ये फुटबॉल खेळला जातो. आता तुम्हाला प्रश्न पडले की फुटबॉलविषयी मी का बोलतोय... तर हा खेळ नेहमी मला एका चांगल्या गोष्टीकडे, चांगल्या विचारांकडे प्रेरित करतो आणि तो विषय म्हणजे ‘ध्येय’!

फुटबॉल खेळात एका ठराविक आखलेल्या चौकटीत दोन विरूद्ध गोलपोस्ट असतात. दोन प्रतिस्पर्धी संघाचे खेळाडू आपापल्या सहकाऱयांकडे चेंडू सरकवित तो प्रतिस्पर्धी संघाच्या गोलपोस्टमध्ये मारून ‘गोल’ साधण्याचा अटोकाट प्रयत्न करीत असतात. अधिकाधिक गोल करण्याचे त्यांचे उद्दिष्ट्य असते व हे उद्दिष्ट्य गाठून अंतिमत: संघाला विजयी करण्याचे त्यांचे ‘ध्येय’ असते. सारे खेळाडू स्वप्रयत्नाने आणि संघभावनेने एकत्रितरीत्या या ध्येयासाठी खेळत असतात. असाच काहीसा प्रकार हॉकी, बेसबॉल, बास्केटबॉल आदी मैदानी खेळांमध्येही असतो. पण फुटबॉल हा जास्त लोकप्रिय असल्यामुळे त्याचे उदाहरण!

आपल्या सणांच्या संस्कृतीमध्येही असाच एक प्रकार हा ध्येय गाठण्याचा असतो आणि तो म्हणजे ‘दहिहंडी’. उंचावर बांधलेल्या दहिहंडीतले ‘ध्येय’ गाठण्यासाठी एकमेकांच्या मदतीने एकावर एक थर रचत; नवनवी उंची गाठत ध्येयापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न या दहिहंडी संस्कृतीचा पाया आहे.

या आणि अशा खेळांमधून ‘ध्येय’ गाठण्यासाठी मनाची म्हणजे मानसिक व शरीराची म्हणजे शारिरीक तयारी होणे महत्त्वाचे.

आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज करतो तेव्हा आपला Bio-data सादर करतो. त्यात बरेचदा आपण आपल्या आयुष्यातील Objective, Aim, Purpose, Goal, Achivement आदींविषयी लिहीत असतो. हे लिहिताना आपल्याला बरेचदा सोप्पे वाटते किंवा आपण कुठुनतरी Copy-Paste करत असतो. पण प्रत्यक्ष आयुष्यात आपल्याला या शब्दांचे महत्त्व आणि त्यांची आयुष्यातली आवश्यकता यांची माहिती असणे गरजेचे असते.

मनुष्य हा असा एकमेव प्राणी असावा ज्याला ‘मन’ या गोष्टीशी झुंजावे लागते. हे ‘मन’ नावाचे जे काही असते ते माणसाला कधीच स्वस्थ बसू देत नाही. अनेक इच्छा-आकांक्षा, स्वप्ने मनात घर करून असतात आणि त्यांच्या पूर्तीसाठी माणूस झगडत असतो. याच इच्छा-आकांक्षा, स्वप्नांना जर काही ठोस, कृतीशील प्रकारात माणसाने व्यक्त करायचे ठरविले तर ते त्याचे ‘ध्येय’ ठरू शकते. मग ते ध्येय वेगवेगळ्या वयात, वेगवेगळ्या स्वरूपात आणि वेगवेगळ्या प्रकारचे असते.आपल्याला हवे ते मिळविण्यासाठीचे प्रयत्न करणे हे जर ध्येयाचे पहिले पाऊल मानले तर जस जसा माणूस वयाने मोठा होत जातो, अनुभवाने विचारी बनत जातो, तस तसे या इच्छा-आकांक्षांना एका विशिष्ट उद्दिष्ट्यापर्यंत नेणे हे क्रमप्राप्त ठरते आणि ते उद्दिष्ट्य गाठणे हे ध्येयपूर्तीचे अंतिम पाऊल असते.

कवी कुसुमाग्रज यांची ‘कोलंबसाचे गर्वगीत’ नावाची एक कविता आहे त्यात अथांग समुद्रवरून जगप्रवासाला निघालेला कोलंबस असे म्हणतो की, ’किनारा तुला पामराला...“ किनारा म्हणजे शेवट. हा सागराला असतो. माझ्यासारख्या सागरावरून जगप्रवासाला निघालेल्या प्रवाश्याला असा काही शेवट नसतो. त्या आधी ‘अनंत आमुची ध्येयासक्ती...’ असेही तो म्हणतो. म्हणजे अनेक प्रकारचे विचार, इच्छा, आकांक्षा मनात येत असतात आणि त्यातून अनंत गोष्टींचा ऊहापोह मनात होत असतो. या सर्व मंथनातून एक ध्येय निश्चित करून त्या दृष्टीने त्या दिशेने वाटचाल करणे हेच माणसाने शिकले पाहिजे. अनुभवले पाहिजे. अंगिकारले पाहिजे. या ध्येयासाठी अथक प्रयत्न करणे, लक्ष विचलित होऊ न देता ध्येयाला आपले अंतिम ‘लक्ष्य’ बनविणे गरजेचे असते. असे करणे खूप अवघड असते पण त्यातच खऱया विजयाचा मार्ग दडलेला असतो. महाभारतात याचा एक उदाहरणस्वरूप प्रसंग आहे. कौरव-पांडव एकत्रितपणे गुरू द्रोणाचार्य यांचेकडे शस्त्रास्त्रविद्या व इतर ज्ञान मिळविण्यासाठी अध्ययन करीत असतात. त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरू द्रोणाचार्य सर्व शिष्यांना एका बागेत घेऊन जातातआणि त्यांच्या धनुर्विद्येची परिक्षा घेण्याचे ठरवितात. त्यासाठी ते लांबवरच्या झाडावर एक खराखुरा दिसणारा परंतु लाकडापासून बनविलेला पक्षीöपोपट ठेवतात आणि शिष्यांना त्या पक्ष्याविषयी; लक्ष्याविषयी सांगून त्या पक्ष्याच्या डोळ्याचा बाणाने वेध घेण्यासाठी सांगतात. प्रत्येक शिष्याने बाणाने नेम धरला की, ते त्याला विचारीत ’बाळ! तुला समोर काय दिसते आहे?“ काही शिष्य सांगत की, मला आजूबाजूचे सर्व काही दिसते आहे. काही सांगत मला पक्षी, फळ, झाड, फांद्या इत्यादी दिसत आहे. असे करत-करत अर्जुनाची वेळ येते. गुरू द्रोण जेव्हा अर्जुनाला विचारतात ’बाळ! नेम धरल्यावर तुला काय दिसत आहे?“ तेव्हा अर्जुनाने उत्तर दिले, ’गुरुवर्य! मला फक्त आणि फक्त पक्षाचा डोळाच दिसतो आहे.“ असे म्हणून त्याने बाणाने पक्षाच्या; लक्ष्याचा वेध घेतला. म्हणजेच ज्या माणसाचे ‘लक्ष’ हे नेहमी फक्त आपल्या ध्येयाकडे; उद्दिष्टाकडे; लक्ष्याकडेच असते, त्याशिवाय त्याला काहीही दिसत नाही, त्यालाच ते ध्येय, लक्ष्य प्राप्त करता येते.
अनेक अडथळ्यांवर जिद्दीने मात करत त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मार्गक्रमणा करणे आणि यशस्वी होणे यातील समाधानासारखा आनंद नाही. माणसाच्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षणही तोच असतो, ज्यावेळी तो जे ध्येय ठरवितो ते प्रयत्नांती पूर्ण करून समाधानाचा आनंद मिळवतो आणि यशस्वी होतो. यशाचा आनंद हा वेगळाच असतो. आपण पाहिलेल्या स्वप्नांची पूर्ती करणे, आपण ठरविलेले उद्दिष्ट्य गाठणे यात कर्तव्यपूर्तीचा भाग असतो आणि अशी कर्तव्यपूर्तता आयुष्याला परीपूर्णता देते. म्हणूनच ध्येय ठेवतानाही ते सहज, सोप्पे ठेऊन उपयोगाचे नाही. ‘सहज मिळे त्यात जीव तृप्तता न पावे, जे सुदूर... जे असाध्य... तेथे मन धावे’ असे मनात आणून निश्चित केलेल्या गोष्टीपर्यंत पोहोचून ती प्राप्त करणे यांत मिळणारा आनंद, समाधान हे निराळेच असते. दहिहंडीचेच पहा ना, ती जितकी उंचावर तितकी ती मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न व त्यातील थरार हा यश, आनंद अधिक द्विगुणीत करणारा असतो. अशा ध्येयप्राप्तीतून तुम्ही स्वत:लाच नव्याने शोधत असता. तुम्ही स्वत:ला नव्याने सिद्ध करत असता. तुम्ही स्वत:ला नव्याने जगासमोर मांडत असता.

आपल्या आजुबाजूला समाजात अशी अनेक उदाहरणे पाहण्यात असतील, ज्यात त्या व्यक्तीने शुन्यापासून सुरूवात करून अथवा प्रतिकूल परिस्थितीशी झगडत, अथक प्रयत्न करत अंतिमत: आपले ध्येय प्राप्त केले आहे आणि त्यातच आपल्या आयुष्याचा आनंद उपभोगिला आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, शहीद भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, डॉ. आनंदीबाई जोशी, रमाबाई रानडे, गाडगेबाबा, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, बाळासाहेब ठाकरे, दादासाहेब फाळके, आबासाहेब गरवारे, जनरल अरुणकुमार वैद्य, शंतनुराव किर्लोस्कर, धिरूभाई अंबानी, बाबा आमटे, सिंधूताई सपकाळ, धनंजय पिल्लै, ‘प्लाईंग सिक्ख’ मिल्खासिंगजी, सचिन तेंडुलकर, एकनाथ सोलकर, पंडित भीमसेन जोशी, लता मंगेशकर, डॉ. रघुनाथ माशेलकर असे अनेक मान्यवर आहेत ज्यांचा उल्लेख करत राहिलो तर केवळ त्यामुळेच हा अंक भरून जाईल. तुम्हीही आपापल्या परीने या यादीत भर घालू शकता. असो.

त्याच वेळी अशा यशात आपल्याबराबर मदतीला आलेल्या आपल्या सहकाऱयांनाही सामील करून घेणे आणि त्यातून आनंद वाटणे, वाढविणे, द्विगुणीत करणे हे आवश्यक आहे, यातून आपण समाजाचे ऋण फेडू शकतो.

छोट्या छोट्या गोष्टींच्या पूर्तीपासून ध्येयाची सुरूवात करून अधिकाधिक मोठे ध्येय गाठण्याचा निरंतर प्रयत्न करणे हे मनुष्य जीवनाचे सुत्र असणे आवश्यक आहे. अशा कृतींमधून एक आत्मविश्वास माणसामध्ये निर्माण होतो. जो मनुष्याला अधिक उद्दिष्टाचे आव्हान स्वीकारण्यासाठी तयार करतो. अशा वेळी माणसाचे अंतिम ध्येय, उद्दिष्ट्य काय असले पाहिजे? याचा विचार केला तर, संत तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या ‘याचसाठी केला होता सारा अट्टाहास... शेवटचा दिस गोड व्हावा’ या काव्यपंक्ती समोर दिसतात. अनेक निरनिराळ्या योनींच्या जन्मानंतर मनुष्यजन्म प्राप्त होतो असे म्हटले जाते. या सर्व प्राणीमात्रांच्या जन्मामध्ये जीवला मोक्ष मिळत नाही पण मनुष्यजन्मामध्ये आपली कर्तव्ये, आपल्यावर असलेली मातृऋण, पितृऋण, देवऋण, गुरुऋण, मित्रऋण, समाजऋण, देशऋण इत्यादी ऋणे फेडून मनुष्य जीवन-मरणाच्या चक्रातून स्वत:ची सुटका करून घेऊ शकतो व सर्वोच्च अशा मोक्षपदाला प्राप्त करून घेऊ शकतो. हे केवळ मनुष्यजन्मातच शक्य होते असे म्हटले जाते. त्यामुळे सर्वोच्च असे हे जे मोक्षप्राप्तीचे ध्येय आहे, ते मनुष्यजन्मात आल्यानंतर प्राप्त करणे हेच मनुष्याच्या जीवनाचे मुख्य सुत्र असले पाहिजे. या ध्येयापर्यंत पोहचण्याआधी जी काही कर्तव्ये अथवा ध्येये मनुष्यजन्माला दिली गेली आहेत, ती ओळखून, पार पाडून अंतिम ध्येयापर्यंत पोहोचण्याची धडपड चालू ठेवणे गरजेचे असते. ही धडपड कोणालाही टाळता येणे शक्य नाही पण या धडपडींलाच जीवनसंघर्ष मानून, तो पूर्ण करून एक एक ध्येय, उद्दिष्ट्य पूर्ण करणे आवश्यक आहे तेव्हाच तो शेवटचा दिस गोड होऊ शकतो.

Thursday, September 5, 2013

चरैवति...चरैवति

हा म्हणे चोर त्याला, तो म्हणे याला....
चोराचोरीच्या या खेळात, खरा चोर पळाला....
ज्याने मिळवले लोणी, तोच जिंकला बाजी
बाकी सारे करत राहती एकमेकांची 'हाजी'
जीव जाता म्हणती सारे होता तो एक भला
पण जीवित होता तेव्हा का नाही समजून घेतले त्याला
काळ-मांजर येत असे दबक्या पावलाने
कोण गेले, कोण राहिले, त्याला काय उणे?
प्रत्येकाला येथे पडला आपलाच सोस
का कशाला कुणी करावा खोटा 'अफसोस'
म्हणून म्हणतो स्वत:च बन तू एक सूर्य
मागू नको भीक प्रकाशाची, अन करत रहा कार्य

Friday, June 14, 2013

संचित


मोडलेले संचित सारे करुनी गोळा मी निघालो पुन्हा
उमटवित वळणावरती काही खाणा-खुणा..
जपल्या, पुसल्या, जरी काही आठवणी
चालत राहणे हेच असते सत्य हर क्षणी

थांबलो काही वेळा वाटले आलेच आपले ठिकाण
पण फसव्या त्या मृगजळाने कधी संपले का तहान
सोसावेना भार जेव्हा तेव्हा तुला आठविले
समजून तुला साथीला मग पाऊल पुढचे टाकिले

किती भेटले सोबती, राहिले काही,गेले काही
चालेन आणखी जोवर 'पूर्तता' (*) ती होत नाही
थांबेन क्षणभर तरीही एखाद्या हाके साठी
'कारण' मी जरी, कर्ता तू आहेस पाठी

- प्रसाद पाठक

(*पूर्तता माझ्या व्यथेची ... by suresh Bhat)