ती सध्या काय करते ? एक वेगळा अनुभव. ...
ही गोष्ट आहे 2006 ची. म्हणजे 11 वर्षांपुर्वीची. त्या वेळी फेसबुक नव्हते. सोशल मिडीया नेटवर्क नुकतेच सुरू झाले होते. Hotmail , ऑर्कुट नुकतेच लोकांना कळू लागले होते. पण त्याचे प्रचंड आकर्षण नवीन जुन्या दोन्ही पीढीला वाटत होते.
आपल्याला माहीत नसणारे पण आपल्याशी संपर्क संवाद साधू इच्छिणारे ' कुणीतरी आहे तिथे ' या जाणीवेने एक वेगळेच थ्रील वाटत होते. बर्याच वेळा आपल्या माणसांशी मनातले बोलू न शकणारे अथवा बोलता न येणारे , अनोळखी त्रयस्थ माणसाशी आपण सहजपणे बोलू शकतो. त्यामुळे ऑर्कुट सारख्या सोशल मीडियावर दूर कुठेतरी असणाऱ्या व्यक्तीला मित्र / मैत्रीण बनवून तिच्याशी मनातल्या गोष्टी व्यक्त करणे सोपे होऊ लागले होते. जग जवळ येऊ लागण्याचा एक नवीन टप्पाच होता तो.
असाच एक मित्र नुकताच माझा माझ्या ऑर्कुट प्रोफाईलवरून झाला होता. ( हि सत्य गोष्ट असल्यामुळे त्याचे नाव मला उघड करता येणार नाही परंतु हि गोष्ट समजण्याच्या दृष्टीने त्याचे नाव आपण अमन म्हणूया) सुरवातीच्या जुजबी ओळखी / चौकशी नंतर आमच्यात चांगला संवाद साधला जातो आहे हे लक्षात आले. अमन हा पोस्ट ग्रॅज्युएट आणि MBA finance केलेला उच्चशिक्षित तरूण असून कच्छ मधील एका शिक्षणक्षेत्राशी संबंधीत संस्थे मध्ये Faculty lecturer होता. त्याच्या पोस्ट्स वाचून मला त्याच्याबद्दल अधिक औत्सुक्य वाटत होते.
एक दिवस बोलता बोलता अमन मला मुंबईत येण्याबद्दल बोलला. तो मुळचा गुजरातमधील कच्छ मधला राहणारा सिंधी समाजातील होता. त्याला मुंबई बद्दल काहीच माहिती नव्हती पण ओढ-उत्सुकता खूप होती. त्याला मुंबईत एकेठिकाणी इंटरव्ह्यूसाठी यायचे होते. मुंबईत कुठेतरी त्याचे एक दूरचे नातेवाईक होते म्हणाला पण त्यांच्या कडे जाण्यापेक्षा दुसरीकडे कुठेतरी सोय होईल का? कारण मुंबईत आल्यासरशी 2 / 3 दिवस राहून मग परत जाणार असल्याने कुठे रहावे असे त्याने विचारले. एव्हाना त्याच्याशी बराच संवाद झालेला असल्यामुळे मी माझ्या घरीच त्याला आणावे असा विचार करत होतो. पण माझे घर अंबरनाथ म्हणजे मुंबईपासून 2 तासाचा प्रवास आणि घरी मी व आई आम्ही दोघेच असायचो. आईला त्याच्यासाठी जास्तीचा त्रास देणे मलाच अवघड वाटत होते. पण आईशी बोललो तर तीलाही आधी आश्चर्य वाटले पण नंतर सहजपणे हो म्हणाली.
कच्छ वरून अहमदाबाद आणि तेथून मुंबई असा खूपच लांबचा प्रवास आणि तोही बसचा रात्रभर प्रवास करून येणार होता तो. त्याने जे मला सांगितले त्यानुसार त्याची बस पहाटे 5.30 / 6 वाजता दादर पूर्वेला दादर टीटी सर्कल मध्ये येणार होती. मी त्याला तेथे भेटावे असे ठरले.
त्यादिवशी मी ऑफिसला सुट्टी टाकली. सकाळी 6 वा. दादर ला हजर राहण्यासाठी अंबरनाथहून मी सकाळची चार सव्वा चार ची लोकल पकडली. त्यावेळी आजच्या सारखे स्मार्ट फोनही नव्हते. त्याने जो मोबाईल नंबर मला दिला होता त्यावरून त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न मी करत होतो. पण कदाचित ट्रॅव्हलींगमध्ये नेटवर्क मिळत नसल्याने संपर्क होत नव्हता. आपल्यावर अवलंबून असलेल्या कोणाचाही आपल्यामुळे खोळंबा होता कामा नये असे माझे कायमच मत. एक्झ्याक्ट 6.10 ला दादर स्टेशनला पोहोचलो. मला तर 10 उशीर झाल्यामुळे चलबिचल वाटत होते. त्याची बस 5/ 5.30 ला च आली असेल तर...? एकटा तो कुठे, कसा थांबेल? नवीन शहर त्याला माहीती नाही त्यामुळे बावचळून जाईल अशा अनेक शंका मनात येत होत्या. धावतच मी दादर टीटी सर्कलला पोहचलो इकडे तिकडे चारही बाजूंना कोणी वाट पाहत ऊभा आहे का पहात होतो. तेथली सगळी दुकाने बंद होती किंवा नुकतीच उघडण्यास सुरवात झाली होती. कोणी दिसले नाही. सकाळचे दुधवाले, पेपरवाले अशी लोकं दिसत होती. थोडं हायसं वाटून पुन्हा एकदोनदा त्याला फोन लावले. 2 / 4 प्रयत्नांनतर एकदाचा फोन लागला...
किधर है... पहुंच गया क्या? ? चौकशी करता करता समजले की अजून तो पोहचला नव्हता. अजून त्याची बस मुंबईच्या जवळ पण मुंबई वेशीबाहेरच पार कुठेतरी मुंबई अहमदाबाद हायवेवर होती. तेथून दहिसर चेकनाका, बोरिवली मग अंधेरी, बांद्रा करत मग दादर टीटी ला येणार म्हणजे अजून कमीतकमी 1.30 ते 2 तास लागणार होते. एव्हाना 6.30 होऊन गेले होते. म्हणजे त्याची बस 8. 30 वाजल्यापर्यंत काही दादर ला येणार नव्हती. दोन तासतरी वाट पहात थांबण्याशिवाय माझ्याकडे काही दुसरा पर्याय नव्हता.
जगामध्ये वाट पाहण्याइतकी दुसरी वाईट्ट आणि कंटाळवाणी गोष्ट नसावी हे त्या दिवशी पुन्हा एकदा समजलं . सकाळची वेळ असल्यामुळे कदाचित भराभर वेळ पुढे सरकत होता पण काहीच काम नसताना नुसताच कुठेतरी बसून वाट पाहत राहणं हे खूपच कठीण. न राहवून मी पुन्हा एकदा ८.३० च्या सुमारास अमनला फोन ट्राय केला. नशिबाने लागला तर समजले मुंबईतील सकाळच्या ट्रॅफिक मध्ये त्याची बस अडकलेली असून अतिशय मंद गतीने मुंबईच्या दिशेने तिचा प्रवास चालू आहे. त्याला मधेच उतर आणि ट्रेन ने ये असे सांगणेही शक्य नव्हते कारण त्याला काहीच माहिती नव्हती. म्हणजे आणखी काही काळ वाट पाहणे अटळ होते.
कोण... कुणाचा.... कुठला.... काळा की गोरा नीटसं माहिती नसलेला, इंटरनेट वरच्या त्याने पाठवलेल्या माहितीवर विश्वास ठेऊन व त्याच्या सीव्ही वरील फोटो पाहून त्याला मित्र म्हणून मान्य केलेला हा कोणी एक तरुण आणि आपण आपले काम धाम बाजूला ठेऊन... घर कधी नव्हे ते भल्या पहाटे सोडून असे कुठे तरी त्याची वाट पाहत बसलो आहोत हे आठवून माझाच मला नवल वाटत होते हसू येत होते. इतकी वाट तर मी शाळा कॉलेज मध्ये मुलीची सुद्धा पहिली नसावी या तुलनेने मला अधिकच हसू येत होते पण आता करणार काय? शब्द तर दिला आहे... तो आपल्यावर अवलंबून आहे त्याचा विश्वासघात करणे मनाला पटत नव्हते. तर काय..... मी आणखी काही वेळ उगीचच इकडे तिकडे करत टाइमपास करत राहिलो. थोडासा चहा नाश्ताही करून घेतला. आधीच माहिती असते तर इतके अगोदर पासून आलोच नसतो ना असे वारंवार मनाला सांगत होतो पण तेव्हडेच त्याची वाटही पाहत होतो. दादर टीटी सर्कल ला खर तर फिरण्यासारखे आहे पण आणि नाही पण. त्यामुळे फिरत तर होतो पण लक्ष कशातही लागत नव्हते. दार तासाभराने त्याला फोन लावून कुठे पोहोचला विचारात होतो. कधी फोन लागत होता कधी लागत नव्हता कारण ही गोष्ट १०-११ वर्षांपूर्वीची आहे त्यावेळी नेटवर्क बोंब होतीच आणि फोन पण साधेच होते.
त्या दिवशी माझे नशीब ठीक नव्हते म्हणाना... खूपवेळ वाट पाहून म्हणजे तुम्ही विश्वास नाही करणार जवळजवळ आणखी ४ तास वाट पाहून १२.३० च्या सुमारास त्याने फोन वर मला सांगितले कि तो दादर पश्चिमेला स्टेशन जवळ उतरला आहे म्हणून. मला गोंधळल्यासारखे झाले. मी त्याने सांगितल्यानुसार दादर टीटी जवळ म्हणजे दादर पूर्वेला त्याची वाट पाहत थांबलोय आणि हा तिकडे पश्चिमेला कसा पोहचला. पण बस मधले बरेचसे सहप्रवासी दादर पश्चिमेला उतरल्यामुळे हा सुद्धा पश्चिमेला उतरला. मी धावतच फोन वर त्याच्याशी बोलत राहून पश्चिमेला कुठे, कुठल्या ठिकाणी याची माहिती घेत पूर्वे कडून पश्चिमेला निघालो.
दादर स्टेशन पश्चिमेचा परिसर ज्यांच्या परिचयाचा आहे त्यांना माझ्या गोंधळाची कल्पना येईल कारण त्याला नक्की कुठे, कसे शोधू ? कसे ओळखू हा माझ्या समोर यक्षप्रश्नच होता. त्यातूनही तो नवा, त्याला इथले काहीच माहिती नाही, त्यामुळे लॅण्डमार्क तरी कसा सांगणार, समजावणार ? ? पण शेवटी कसेतरी त्याच्याशी बोलत बोलत तू आहे तिथेच थांब मी येतो, पोहचतो तेथे असे करत करत त्याच्या शेजारी पोहचलो. .. आणि शेवटी तो भेटला. ...
अमन. ... 22 / 23 वर्षांचा, गोरा, नाजुक बांध्याचा, हस-या चेहर्यावर सिंधी-गुजराती मिश्रण असलेला, बोलण्या-वागण्यातून सभ्यपणा (डीसेन्सी), सुशिक्षितपणा जाणवणारा असा तो तरूण मी काहीशी कल्पना केल्याप्रमाणेच पण काहीसा वेगळेपणा जपलेला होता. मुख्य गडबड होती ती तो स्वतःबरोबर घेऊन आलेल्या अपेक्षांची आणि त्यासोबतच आलेल्या जवाबदारीची. इंटरव्ह्यूसाठी म्हणून आलेला अमन त्याच्या बरोबर चक्क कपडे-पुस्तके-सामानसुमानाच्या दोन-दोन बॅगा घेऊन आलेला होता. अखेर एकदाचा त्याला हव्या असलेल्या मुंबईत पोहचल्यामुळे तो खूप excited होता. थोडा निश्वास, सुस्कारा टाकून मी त्याला आधी तेथे जवळच असलेल्या एका हाॅटेल मध्ये घेऊन गेलो. काही खाण्याची ऑर्डर करून त्याला cool down केले.
शांतपणे चौकशी केली तेव्हा समजले की त्याचा इंटरव्ह्यू Mid Day पेपरच्या ऑफिस मध्ये संध्याकाळी 4 वाजता होणार आहे म्हणून. एव्हाना दुपारचा 1.30 वाजून गेला होता. आता इथून अंबरनाथ ला परत जाणे व 4 वाजेपर्यंत पून्हा मुंबईत करीरोड येथील मिड डे च्या ऑफिस मध्ये पोहचणे अवघड होते हे मला लक्षात आले. पण रात्रभर बस प्रवास करून आलेल्या अमन ला त्याची काहीच कल्पना नव्हती. त्याला आता फक्त फ्रेश होऊन इंटरव्ह्यूसाठी तयार व्हायचे होते.
विचार करून मी विलेपार्ले मुंबईतील दुसर्या एका मित्राला फोन केला. तो घरी एकटाच रहात असे. विलेपार्ले स्टेशनजवळच त्याचे घर असल्यामुळे दादर वरून पटकन एका गाडीने त्याच्या घरी जाऊन, अमन ला फ्रेश होऊन तसेच पटकन दुसर्या गाडीने करीरोड ला 4 वाजेपर्यंत पर्यंत पोहचणे सोप्पे होते. तो मित्रही सहृदयी असल्यानेच आमची अडचण लक्षात आल्यावर चटकन हो म्हणूनच थांबला नाही तर आम्ही त्याच्या घरी पोहचेपर्यंत त्याने आमच्यासाठी चहा सुद्धा तयार करून ठेवला होता. दरम्यान च्या काळात मी घरी अंबरनाथला फोन करून आईला रात्री उशीरा पोहचत असल्याबद्दल कळवले. पार्ल्याला मित्राच्या घरी अमन आंघोळ - आवराआवर व तयारी करून इंटरव्ह्यूसाठी तयार झाला आणि आम्ही त्या पार्लेकर मित्राचे आभार मानून करीरोड ला निघालो.
अमन साठी सगळे नवीनच आणि exciting होते पण मला त्यावेळी आपण करतोय त्या मागच्या जवाबदारीच्या जाणीवेने थकवा जाणवत होता. सकाळी 4 वाजल्यापासून सुरू झालेली माझी काळजी व धावपळ अजून सुरूच होती. करीरोड ला त्याला घेऊन जाणे, त्याचा इंटरव्ह्यू पूर्ण होई पर्यन्त त्याच्या सामानाची काळजी घेत पुन्हा एकदा वाट पहात थांबणे, त्यानंतर संध्याकाळच्या गर्दीत त्याला दादर वरून फास्ट गाडी पकडणे शक्य नाही हे लक्षात घेऊन त्याला भायखळ्याला नेऊन तेथून अंबरनाथ फास्ट गाडी पकडून त्याला अंबरनाथला घरी घेऊन येणे हे सगळे पार पाडत असताना अमन ला अधिकाधिक जाणून घेण्याचा प्रयत्न मी करत होतो आणि मला जे कळून येत होते ते प्रचंड वेगळेच, आयुष्याची वेगळीच ओळख करून देणारे, काहीशी काळजी म्हणता येणार नाही पण विचार करायला लावणारे होते... काहीसा वेगळा विचार जो या पूर्वी कधीही केलेला नव्हता.
कच्छ ला एका सर्वसाधारण सामान्य कनिष्ठ मध्यमवर्गीय सिंधी कुटुंबातील अमन हा एकुलता एक मुलगा. सिंधी लोक बहुतेक व्यापारधंद्यात असतात त्याप्रमाणे अमनची फॅमिली बॅकग्राऊंड सुद्धा उद्योगधंद्यातीलच होती. वडीलांना ती जबाबदारी फारशी चांगली सांभाळता न आल्याने कुटुंबाची आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती. कर्जाचा भार घरावर होता. तशातच आईवडील त्याच्या लग्नासाठी प्रयत्नशील होते. त्यामुळे अमनला खूपश्या गोष्टी करावयाच्या असूनही न करता आलेल्या, मनात राहून गेलेल्या, रेंगाळत असलेल्या, खुणावत असलेल्या होत्या. कदाचित त्यामुळे त्याने स्वतःला अभ्यासात गुंतवून घेतले होते व तो अभ्यासू असल्याने पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत यशस्वी होत आला होता. घरची जबाबदारी घेणे अटळ असल्यामुळे कच्छ मधीलच एका शिक्षणसंस्थेत कामाला तर लागला होता. पण फुलपंखी मन स्वस्थ बसून देत नव्हते. मुंबईत आपल्या स्वप्नांना नक्की साकार करता येईल या प्रचंड आशावादाने तो उत्साहाने मुंबईत आला होता. सर्वात मोठे आव्हान होते ते आईवडिलांच्या इच्छेविरूद्ध जाऊन लगेच लग्न न करता मुंबई-पुणे अथवा अश्या अन्य मोठ्या शहरात जाऊन आपल्याला हवे तसे आयुष्य जगण्याचे होते. बोलता बोलता तो म्हणाला की त्याला पुण्याला फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मध्ये जायचे आहे, शिकायचे आहे, लिखाण करायचे आहे. .... खूप काही करायचे आहे. ... पण. ... तो इतके सारे सामान घेऊन का आला होता याचा मला उलगडा होत होता...
त्या रात्री आम्ही अंबरनाथला खूप वेळ बोलत बसलो होतो. .. त्याने जे मला सांगितले ते ऐकून मला झोप येणे शक्यच नव्हते. जरी मी सकाळी भल्या पहाटे पासून ऊठून, धावपळ करून दमलेलो असलो तरीही... एक मुलगा इंटरनेट वरून तुमच्याशी मैत्री करतो... तुमच्या वर विश्वास ठेवून कच्छ सारख्या छोट्या शहरातील आपले घर, कुटुंब सोडून मुंबईत पुढचे आयुष्य व्यतीत करायचे म्हणून येतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याला पुढचे आयुष्य एक मुलगी म्हणून जगायचे असते हे जेव्हा तुम्हाला कळते तेव्हा तुम्हाला झोप येणे शक्य आहे का हो ?
मी दुसर्या दिवशी सुद्धा ऑफिसला दांडी मारली. अमन ला मुंबई पहायची, फिरायची होती. काही खरेदी करायची होती. सर्व प्रथम त्याला घेऊन मी प्रभादेवीला सिद्धीविनायक ला गेलो. त्याच्या बरोबर मी पण त्याच्यासाठी बाप्पाला प्रार्थना केली. मग तेथून वरळी हाजीअली, महालक्ष्मी, पेडररोड, बाबुलनाथ, कमला नेहरू उद्यान करत गिरगाव चौपाटीवर आलो. तिथे थोडे थांबून मग नरिमन पॉइंट वरून गेट वे ऑफ इंडिया ला आलो. सगळी मुंबई पहाण्यात त्याला खूप आनंद वाटत होता आणि त्याला आनंदी पाहून मला समाधान. मग तेथून आम्ही फॅशन स्ट्रीट वर फिरलो. त्याने एक दोन टीशर्ट खरेदी केले. मग सीएसटी वरून संध्याकाळी अंबरनाथला परत आलो. या सर्व प्रवासात मी त्याला पुढे काय करणार? आई वडीलांशी मोकळेपणाने बोल... निर्णय तूच घ्यायचा आहे पण तो पूर्ण विचार करून, विचारपूर्वक घे. कुणालाही दुखवू नकोस. आर्थिक अडचण कशी सोडवशील... असे एक ना अनेक प्रश्नांबद्दल बोलत होतो... बोलता करत होतो... मोकळा करत होतो... त्यालाही हे खूप दिवसांपासून मनात दडवून ठेवलेले मोकळे करायचेच होते. त्या शिवाय त्यालाही नीट निर्णय घेता आला नसता.
मला या अश्या जगण्यातून दमलो आहे. त्रास होतो आहे मला. कंटाळा आला आहे मला अश्या जीवनाचा. एकतर मरून जावेसे वाटतेय किंवा मग मुलगी होण्यासाठी जे करावे लागेल ते करावेसे वाटतेय. काय करू मी ? तो रडत होता, सांगत होता. मलाही कळत नव्हते की मी याला कसे समजावणार ? मुळात आपल्या कुटुंबांतील व्यक्तींकडेही व्यक्त करू शकत नसलेले सारे काही तो माझ्या कडे बोलत होता. मी लांबचा त्रयस्थ असल्यामुळे कदाचित पण त्याला माझ्याशी बोलण्यात संकोच वाटत नव्हता. मी त्याला या अडचणीतून बाहेर काढेन की नाही याची त्याला पर्वा नव्हती पण कुणाकडे तरी त्याला मनमोकळे व्यक्त व्हायचे होते. त्याचे म्हणणे ऐकून घेणाऱ्या कुणाकडे तरी. त्या वेळेपुरता तरी मी ती भुमिका स्वीकारली होती. त्याची होत असलेली मानसिक घुसमट, कुटुंब, जवाबदारी, आर्थिक अडचण, लग्नाचे बंधन, समाजाचा दृष्टिकोन, अश्या अनेक गोष्टीबाबत त्या रात्री आम्ही बोलत होतो. चटकन सुटेल असा प्रश्न नव्हताच तो. मार्ग मिळेल या आशेवरच त्याचे तुटपुंजे समाधान करत त्याला खंबीरपणे या अडचणीतून बाहेर पडण्याचा मी केवळ सल्ला दिला. तूला जे करायचे आहे ते आईवडिलांना खंबीरपणे सांगून त्यांचाही होकार मिळव.
त्याच्या परत अहमदाबाद ला जाण्याच्यावेळी त्याला बांद्रा टर्मिनस ला सोडायला गेलो तेव्हा त्याच्या भविष्याच्या काळजीने मलाही खूप अस्वस्थ केले. खूप काही गोष्टी त्याला करायच्या होत्या. ... कशा करणार तो ? त्याच्या प्रयत्नांना यश मिळेल का ? एक ना दोन अनेक शंका मनात दाटल्या होत्या. त्याला जड मनाने पण सदिच्छापूर्वक निरोप दिला आणि खूप रिक्त रिकाम्या असहाय्यक अवस्थेत परत फिरलो. तो सुखरूप घरी पोहोचल्याच्या निरोपानंतरच ती अवस्था काहीशी कमी झाली.
त्या नंतर त्याच्याशी मी अधूनमधून फोन, इंटरनेट चॅटींग, sms याद्वारे संपर्कात होतो. त्याने पुढील शिक्षण PhD पुण्यात करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याला मदतीसाठी पुण्यातील काही मित्रांचे संपर्क नंबर दिले व त्याची ख्यालीखुशाली अधूनमधून घेत राहिलो.
हा संपर्क काही काळ राहीला. खरं तर तो वाढायला हवा होता पण नंतर काही कारणाने तो तुटला. पुण्यातील ओळखीच्या मित्रांकडे चौकशी केली पण फारशी माहिती मिळाली नाही फक्त अमन पुन्हा कच्छला परत गेल्याचे समजले.
त्या नंतर बर्याच दिवसांनी एक दिवस अचानक गुगलवरील सर्चमध्ये गुजरात मधील एका तरूण प्रोफेसरने मुंबईत लिंग बदलाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करून घेतली ही बातमी वाचली आणि आश्चर्यचकितच झालो. एकीकडे आनंद व एकीकडे दु:ख असे दोन्ही भाव मनात एकाच वेळी दाटले. आनंद यासाठी कारण त्याने खंबीरपणे स्वतःला सकारात्मकपणे सावरले व स्वतःच्या इच्छेला प्रत्यक्ष उतरवले. तर दुःख यासाठी की आयुष्यातील एवढ्या मोठ्या निर्णयाच्या वेळी तो मुंबईत असूनही मी त्याच्या संपर्कात नव्हतो. कदाचित आयुष्याची नव्याने मांडणी आणि सुरवात करताना मागचे कोणतेच दोर त्यालाही ठेवायचे नव्हते. सगळेच त्याने तोडून टाकले असावेत. असो. ...
आज इतक्या वर्षांनी हे सगळे आठवण होण्याची आणि लिहीण्याचे कारण नुकतेच फेसबुकवर दोन ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या बातम्यांची लिंक व्हिडिओ पहायला मिळाले. तामिळनाडू राज्यातील एक तृतीयपंथी प्रीतीका यशिनी यांनी पोलीस सब इन्स्पेक्टर पदासाठी केलेली लढाई व गौरी सावंत यांनी तृतीयपंथी असूनही एका मुलीचे स्वीकारलेले पालकत्व निश्चितच प्रेरणादायी आहे.
आताच्या बदलेल्या काळात या सगळ्या बातम्यांकडे पहाण्याचा समाजाचा दृष्टिकोनही पुर्वी पेक्षा अधिक समजूतदार झाला आहे. पण तरीही अशा एखाद्या व्यक्तीला सर्वसामान्यपणे स्वीकारून त्यांना त्यांचे अधिकार मिळण्यासाठी अजूनही धडपड, संघर्ष करावाच लागतो. समलैंगिक, तृतीयपंथी, लिंगबदल करून नव्याने जीवन सुरू करू पाहणाऱ्या व्यक्ती यासर्वांना समाज कसा स्वीकारतो, त्यांची खिल्ली उडवतो का, त्यांना पुरूषप्रधान संस्कृतीत वासनेचे बळी पडावे लागते का, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षमपणे त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत मिळते का अश्या अनेक बाबींचा विचार करता आज पुर्वीचा अमन असलेला आणि आता अमिना झालेली ' ती सध्या काय करतेय ' ? हा प्रश्न आणि त्यासोबतच बनणारी इतर प्रश्नांची मालिका खरंच माझ्या समोर कोडे बनून राहिली आहे. त्याचे उत्तर कसे व कधी मिळेल हेही ठाऊक नाही. त्याला नव्हे तिला आणि तिच्या प्रमाणे आयुष्याला सामोरे जाणाऱ्या सर्वांना शुभेच्छा!